महसूल खात्याची प्रतिमा सुधारा - पतंगराव कदमशिर्डी, ता. २७ - ""तालुक्यात सर्वाधिक वेतनश्रेणी, बसायला गाडी, गाडीवर पिवळा दिवा आणि पुरेसे इंधन देऊ, रिक्त पदे भरू आणि सर्वांना प्रशिक्षण देऊन "हायटेक' करू.मात्र, तुम्ही लोकांची कामे वेळेवर करा. त्यांना हेलपाटे मारायला लावू नका. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, असा समज होता कामा नये. रोज एका तरी गरिबाचे काम करून द्या. महसूल खात्याची प्रतिमा सुधारा,'' अशी सूचना महसूलमंत्री पतंगराव कदम यांनी शनिवारी राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना केली. तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या येथे झालेल्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते. या वेळी साई संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे, महसूल महासंघाचे अध्यक्ष बी. डी. शिंदे, संघटनेचे अध्यक्ष एन. डी. मालोदे, विभागीय महसूल आयुक्त डॉ. संजय चहांदे, ओमप्रकाश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन, अप्पर जिल्हाधिकारी बाबूराव केंद्रे, उपनिवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब दांगडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तहसीलदारांना तालुक्यात इतर अधिकाऱ्यांच्या तुलनेत अधिक वेतनश्रेणी असावी, रिक्त पदे भरली जावीत, गाडी व गाडीला इंधन मिळावे. गाडीवर पिवळा दिवा लावण्याची परवानगी मिळावी, माहिती तंत्रज्ञानासह अन्य आवश्यक ते प्रशिक्षण मिळावे, संगणक-लॅपटॉप मिळावेत आदी प्रमुख मागण्या संघटनेने या अधिवेशनात केल्या. सुधारित वेतनश्रेणीसह सर्व मागण्या आपल्याला तत्त्वतः मान्य आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने घोषणा करणार नाही. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या मार्गी लावू, असे आश्वासन कदम यांनी दिले. कदम म्हणाले, ""शेतकऱ्यांना सातबाराचा उतारा अथवा नागरिकांना रेशनकार्ड वेळेवर मिळते का, खाली दाद लागत नाही म्हणून नागरिक मंत्रालयात गर्दी करतात, असे का होते, याचे उत्तर शोधायला हवे. चुकीचे वागू नका, लोकप्रतिनिधी चुकीची कामे सांगत असतील, तर दबावाखाली येऊ नका. आपले खाते राज्यात क्रमांक दोनचे आहे. तुम्ही राज्यासाठी वर्षाकाठी पंधरा-वीस हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करून देता. तुम्हाला आवश्यक ते सर्व काही द्यायलाच हवे. आठ महिन्यांत आपल्याला खात्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे. त्यासाठी "यशदा'मार्फत वर्षाकाठी किमान शंभर तहसीलदारांना प्रशिक्षण देऊ. प्रत्येक जिल्ह्यात महसूल भवन बांधू.'' या वेळी चहांदे, कचरे, यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक बाळासाहेब वाकचौरे यांनी केले. सूत्रसंचालन विकास शिवगजे यांनी केले, तर राहात्याचे तहसीलदार यशवंत माने यांनी आभार मानले. ----------------------------------------------------- जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारीच! तहसीलदारांची इंधनखर्चाची तब्बल चार कोटी रुपयांची थकबाकी राज्य सरकारकडे आहे. विदर्भातील एका जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी आहेत. उर्वरित सर्व महसुली पदे रिक्त आहेत, अशी माहिती खुद्द महसूलमंत्र्यांनीच दिली. -----------------------------------------------------