माहीतगार नागरिक तयार होताहेत - प्रल्हाद कचरे, संचालक, सार्वजनिक धोरण केंद्र (यशदा)
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार हे माझं गाव. शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. शिक्षण घेण्यासाठी बोर्डिंगमध्ये राहिलो. कारण, मला उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी विधायक कामे करायची होती. त्यासाठी मी धडपडत राहिलो. अखेर त्याला यश आलंच. त्यामुळेच मी सध्या पुणे येथील सार्वजनिक धोरण केंद्राच्या (यशदा) संचालक पदापर्यंत झेप घेऊ शकलो.
मी शिक्षण घेत असताना 12 वी पासूनच विविध ठिकाणी नोकरी करू लागलो. संगमनेर येथील न्यायालयात स्टेनो म्हणून काम केलं. संगमनेर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून 1885-86 मध्ये नोकरी केली. मात्र, मला सामाजिक कामं करण्याची आवड लागल्यानं हे क्षेत्र कमी पडू लागलं. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरविलं. त्यासाठी काही मित्र व मी भित्तिपत्रिका चालवण्यास सुरवात केली. काही प्रश्न तयार करून ते भिंतीवर लिहायचे व त्याचा सराव करायचा. महिन्यातून चार वेळेस हा प्रयोग आम्ही करत होतो. सामान्य कुटुंबीयांतील मुलांसाठी स्पर्धा परीक्षेचं पुस्तक तयार करण्याचं आम्ही ठरवलं. मात्र, पैसे नसल्यानं सोसायटी काढून त्रिमूर्ती प्रकाशन संस्था काढली. दरम्यानच्या काळात अभ्यास करता-करता माझी निवड तहसीलदार म्हणून झाली. नगर व नाशिक येथे तहसीलदार, त्या पाठोपाठ 1996 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलं. नाशिक येथे महसूल प्रशासनात सहायक आयुक्त म्हणूनही कार्यरत होतो. या दरम्यान केलेल्या अनेक कामांमुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की प्रशासनामध्ये चांगल्या माणसांची नितांत गरज आहे. पिशव्या व बॅगा घेऊन येणारे अनेक जण असल्यानं गोर- गरिबांवर अन्याय होतो. त्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल माझ्या मनात चीड निर्माण झाली. जेथे जेथे भ्रष्टाचार होतो तेथून तो मुळासकट उपटून टाकण्याचा मी ध्यास घेतला. याच दरम्यान माझी "यशदा'मध्ये निवड झाल्याने माहिती अधिकारामुळे (आरटीआय) मला ते शक्य होत आहे. आम्ही तीन महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स सुरू केला असून, त्यातून अनेक कार्यकर्ते तयार होणार आहेत. सामाजिक संस्थांपर्यत पोचण्याचा प्रयत्न आम्ही करत असून, लोककला, लोकपथक, कीर्तन व भारूडाच्या माध्यमातून आम्ही माहितीचा अधिकार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहे. माहीतगार नागरिक निर्माण करणं हाच आमचा मुख्य उद्देश आहे. मात्र, काही जण माहिती अधिकाराचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. त्यामुळे जनजागृती होण्याऐवजी मूळ हेतूलाच धोका पोचत आहे. मात्र, माहिती अधिकाराचा वापर करून अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत, हेही विसरता कामा नये. या प्रक्रियेत सामान्य माणूसही आता सहभागी होत असून, सहभागशील लोकशाही निर्माण होत असल्याचा मला आनंद होत आहे. अधिकाऱ्यांकडेही देण्यासारखं खूप काही असतं. मात्र ते देत नाही. सामान्यांचीच पिळवणूक करण्यात ते वेळ व्यर्थ घालवितात. मात्र "आरटीआय'मुळे या सर्व गोष्टींवर वचक बसणार आहे.
आपल्या आवाक्यात एखादी गोष्ट असल्यास ती अधिकाऱ्यांनी करून टाकावी. मात्र, गोरगरिबांची पिळवणूक करू नये. काम होत नसेल तर नाही म्हणा; पण खोटी आशा त्यांना दाखवू नका, त्यांच्या समस्या जाणून घ्या, असे केल्यास एक दिवस तुम्हीही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही.
शब्दांकन : अरुण सुर्वे
3 comments:
सर आपला कालच्या सकाळ पेपरमधील सदर लेख वाचला, खुप आवडला कारण त्यातून खूप प्रेरणा मिळते कि सामान्य परिस्थितीतून देखिल माणूस बरेच काही करु शकतो. तसेच सर, आपण त्यात उपजिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास दिला पण आपण तर अतिरिक्त जिल्हाधिकारी देखिल झाला आहात. त्याचा उल्लेख झाला नाही. असो अतिरिक्त जिल्हाधिकारी झाल्याबददल आपले हार्दीक अभिनंदन.
Thanks Rajeshri. This interview was conducted by Arun Surve a month ago and then I was not in receipt of promotion order. Thanks for your support and best wishes.
Pralhad Kachare
sir,lekh chhan aahe.arthat to vicharana aani kruti tun ghadalay..mahnun chhan aahe.mi katakshane sensible rahin.
Post a Comment